सलील कुलकर्णीं का म्हणाले, '१९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जे झालं ते कोणीच विसरू शकलेलं नाही!'

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम आजही चांगलाच रंगतो. काव्य-सूरांची ही मैफल आजही रसिकांनी भुरळ घालतेच. हा कार्यक्रम न पाहणारे अगदी विरळाच असतील. आज या अजरामर, एव्हरग्रीन कार्यक्रमाला १९ वर्ष झाली आहेत. त्यानिमित्तानं संदीप खरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
गीतकार संदीप खरे लिहितात, 'एकदा काय झालं की १९ वर्षांपूर्वी एक छोटीशी मैफिल रंगली पुण्यातल्या एका छोट्या सभागृहात झाली. आपल्या आपल्या आनंदासाठी आपली आपली गाणी आणि कविता घेऊन आपल्या काही लोकांसमोर कविता वाचल्या. गाणी म्हटली! जरा चुकीचे होते.जरा बरोबर होते.पण लोकांना ते सारे फार फार आपले वाटले! आणि मग रसिकांसोबत जमलं एक सहज सुंदर मैत्र. गावागावातून, शहरातून, परदेशातून!
ते पुढे लिहितात, 'गेली १९ वर्षे ही मैत्री रंगतेच आहे! अगदी अगदी डोळ्यांदेखत छोट्या छोट्या मुलांचे तरुण-तरुणी झाले, तरुण-तरुणांचे आई-वडील झाले, प्रौढांचे आजी आजोबा झाले. पण आजही बालगटापासून आजी-आजोबांपर्यंत सारे सोबत गात आहेत. नवनव्या कवितांना मनःपूर्वक दाद देत आहेत. आता हे सारे फक्त रसिक उरले नाहीत. गणगोत झाले. एखाद्या कार्यक्रमाचं कुटुंब व्हावं हा भाग्ययोग विरळा. देवकृपेने आणि असंख्यांच्या आशीर्वाद - शुभेच्छांनी तो जमून आला!'
